पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: जमीन खरेदी करण्यासाठी एका शाळेच्या मुख्याध्यापकाने मित्राकडून ५ लाख उसने घेतले होते. परंतु ठरलेल्या मुदतीत मित्राला पैसे न देता त्यास बनावट धनादेश देऊन फसवणूक केली. या प्रकरणी धनगर टाकळी येथील एका आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर माणिका भुसारे यांना पूर्णा न्यायालयाने ३ महिने कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावला. या प्रकरणी किशोर बबनअप्पा नागठाणे यांनी फिर्याद दिली होती. (Parbhani News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गौर (ता. पूर्णा) येथील शेतकरी किशोर नागठाणे यांनी मैत्रीखातर नावकी येथील रहिवाशी आणि धनगर टाकळी येथील एका आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भुसारे यांना जमीन खरेदी करण्यासाठी दि.१२ जुलै २०१३ रोजी २ लाख ५० हजार रुपये दिले होते. त्यानंतर दि. १० सप्टेंबर २०१३ रोजी आणखी २ लाख ५० हजार असे एकूण ५ लाख रुपये उसने म्हणून दिले होते. (Parbhani News)
परंतु, ठरल्या मुदतीत भुसारे यांनी नागठाणे यांना उसने घेतलेले पैसे परत न करता स्वत:च्या नावचा किसान नागरी सहकारी बँक लि. परभणी या बँकेचा ५ लाखांचा धनादेश त्याच्या नावे दिला. हा धनादेश नागठाणे यांनी आपल्या खात्यात जमा केला असता तो भुसारे यांच्या खात्यात शिल्लक रक्कम नसल्यामुळे बाऊन्स झाला. त्यावरुन नागठाणे यांनी वकिलामार्फत पूर्णा येथील फौजदारी न्यायालयात प्रकरण दाखल केले.
त्यानंतर सदर प्रकरणी फिर्यादीच्या बाजूने चार साक्षीदार आणि आरोपीच्या बाजूने एक साक्षीदार न्यायालयाने तपासले व दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर गुरूवारी (दि. ८) न्यायमूर्ती गजानन जानकर यांनी आरोपीस ५ लाख रुपये दंड आणि तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षाच्या बाजुने अॅड. कैलाश पंडीतराव पारवे यांनी काम पाहिले.