

परभणी: राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खाते प्रमुख, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार मंगळवारी (दि.28) राज्यात चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार परभणी विभागातील सुरक्षा व दक्षता खात्यामार्फतही मोहीम हाती घेतली असता पाथरी आगारातील एक यांत्रिकी कर्मचारी कामगिरी दरम्यान मद्यप्राशन अवस्थेत आढळला.
सदरील मोहिमेदरम्यान परभणी विभागातील विविध आगारांतील कामगिरीवरील एकूण ३८ कर्मचारी (चालक, वाहक व यांत्रिकी) यांची ब्रीद अनालायझर मशीनच्या सहाय्याने तपासणी करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन डफले यांनी दिली आहे. या दरम्यान पाथरी आगारातील एक यांत्रिकी कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेबाबत संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी दिली.
महामंडळाच्या सुरक्षा खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा उद्देश प्रवासी सुरक्षेची हमी देणे व कामगिरीवरील कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणि दक्षतेची जाणीव निर्माण करणे हा आहे. ही मोहीम केवळ परभणीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात राबविण्यात आली आहे. यापुढे देखील राज्यभरातील सर्व विभागांमध्ये अशा प्रकारच्या अचानक व वारंवार तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असून, कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून शिस्तभंगात्मक कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन महामंडळ प्रशासनाने दिला आहे.