

NCP Suresh Nagare
जिंतूर : ज्यांनी मला सोडले, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सत्तेत सहभागी व्हायचे असल्याने ते भाजपमध्ये गेले. मात्र, मी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकांमध्ये मी आणि माजी आमदार विजय भांबळे एकदिलाने काम करून पक्ष मजबूत करू, असा विश्वास युवा नेते सुरेश नागरे यांनी आज (दि.११) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, मी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.
अलीकडेच नागरे यांचे खंदे समर्थक आणि ओबीसी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य नाना राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे जिंतूर मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली
या पत्रकार परिषदेत सुरेश नागरे यांच्यासोबत त्यांची पत्नी अमृता नागरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, केशव बुधवंत, बासुखा पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी आमदार विजय भांबळे आणि सुरेश नागरे यांनीही स्पष्ट संकेत दिले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंतूर तालुक्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट (राष्ट्रवादी) अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.