

Jamjam Colony fire incident
परभणी : शहरातील कौडगाव रोडवरील जमजम कॉलनी भागातील एका घराला मंगळवारी (दि.13) पहाटे 3 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
परभणी शहरातील जमजम कॉलनी येथील शेख इनुस शेख सुलतान यांच्या घराला मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी घरात कोणीही नव्हते. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला सरवर शेख यांनी फोनवरून दिली.
तात्काळ अग्निशमनदलाच्या पथकाने घटनास्थळी येवून ही लागलेली आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात येईपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान अग्निशमनचे जवान उमेश कदम, निखिल बेंडसुरे, वाहन चालक वसीम अखिल अहमद यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.