

परभणी : शहरातील रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणारा काँक्रीट मिक्सर महामार्गावरील दुभाजक तोडून थेट जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आदळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र न्यायालयाच्या संरचनेचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. बस स्थानकाकडून येणारा काँक्रीट मिक्सर अतिवेगात होता. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकने रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक फोडला आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने जाऊन थेट न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली. ट्रकची धडक एवढी जबरदस्त होती की दुभाजकाचे मोठे स्लॅब उडाले, आणि ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडला गेला.
न्यायालयाच्या गेटला आणि समोरील संरक्षक भिंतीला मोठा धक्का बसला आहे. अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने न्यायालय परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रथमदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेत इतर कोणालाही इजा झाली नाही, हे नक्कीच सुदैवी मानले जात आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाला होता का?, चालक झोपेत होता काय़, की अन्य कोणती यांत्रिक बिघाड होती याबाबत नागरिकात चर्चा होत होती.