पूर्णा: पूर्णा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे थुनानदी, गोदावरी नदी, पूर्णा नदीला पूर आला असून ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने सर्व पिके जलमय झाली आहेत. त्यामुळे तरारलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.
संततधार आणि चळकधार पावसाचा बैलपोळा सणाला मोठा फटका बसला. वर्षभर शेतात औत ओढणा-या बैलांच्या कष्टाची कृतज्ञता म्हणून बैल पोळा सण साजरा केला जातो. शेतकऱ्यांकडून मारोती मंदीर, महादेव मंदिरात बैलांचे लग्न लावल्यानंतर त्यांची प्रदक्षिणा घातली जाते. परंतु, पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले.
माटेगाव जवळील नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरुन पाणी वाहत आहेत. त्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. थुना नदीचे पाणी नदीकाठच्या पिकांत घुसून पिके जलमय झाली आहेत. तर या नदीवरील पुलाचे काम रेंगाळल्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.