परभणी, पुढारी वृत्तसेवा : वसमत रस्त्यावरील आर. आर. पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका वयोवृद्ध नागरिकास भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२३) सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली. अरविंद यशवंतराव वाघमारे (वय ७३, रामकृष्ण नगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी अरविंद वाघमारे रामकृष्ण नगर येथे वसमत रोड ओलांडून पलीकडे जात होते. यावेळी भरधाव येणार्या ट्रकने (एच.एच.26 एच. 6848) वाघमारे यांना जोरदार धडक दिली. यात ट्रकची चाके त्यांच्या अंगावरून गेली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकास ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आला आहे.