गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: गंगाखेड, पालम तालुक्यासह परिसरातील परळी, अंबेजोगाई, अहमदपूर, उदगीर, जळकोट, जिंतूर, औंढा नागनाथ तसेच लोहा व कंधार तालुक्याच्या डोंगरी भागातील गावांना शासनाने डोंगरी भागातील गावे म्हणून जाहीर करावीत, या मुख्य मागणीसह अन्य २० मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजता डोंगरी विकास परिषद प्रणित डोंगरी सेनेच्या वतीने आयोजित डोंगरी जनांचा धडक आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला. धडक आक्रोश मोर्चाचे नेते भाई प्रा. ज्ञानोबा मुंढे यांनी यावेळी आजवरच्या व विद्यमान सरकारवर सडकून टीका केली.
शहरातील भगवती चौकातून निघालेला मोर्चा व्यापार पेठेच्या मुख्य रस्त्यावरून तहसीलवर धडकला. डोंगरी भागातून आलेल्या नागरिकांच्या घोषणेने शहर दणाणून गेले होते. डॉ. आंबेडकर चौकात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
मागील अनेक वर्षांपासून गंगाखेड पालमसह मराठवाड्यातील डोंगरी भागातील गावांना पूर्वीचे व विद्यमान सरकार न्याय देण्यास तयार नाही. परिणामी परिसराचा विकास खुंटीत झाला असून सरकारने डोंगरी भागाच्या समस्यांची तत्काळ सोडवणूक करावी, अशी मागणी मोर्चाचे आयोजक तथा डोंगरी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा मुंढे यांनी यावेळी केली.
मोर्चास गंगाखेड पालम तालुक्यातील डोंगरी भागांच्या विविध सामाजिक संघटनाचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदारांना आंदोलकांनी निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.