

Burglary in Purna city, gold and silver ornaments worth Rs 1.5 lakh looted
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवा मोंढा परिसरात बुधवारी (दि.८) भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ५५ हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांनी तपास सुरू केला आहेत.
नवा मोंढा भागातील व्यापारी अनिल मुन्नलाल अग्रवाल यांच्या दोन मजली घरात बुधवारी दुपारी साडेअकरा ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. सध्या अग्रवाल कुटुंबीय हे कर्नाटकात मुलीकडे श्रीमद् भागवत कथेसाठी ६ ऑक्टोबरला गेलेले असून, घरात त्यांचा मुलगा संकेत अग्रवाल एकटा होता. बुधवारी सकाळी दुकानासाठी बाहेर जाताना त्याने घराला कुलूप लावले होते.
सायंकाळी घरी परत आल्यावर त्याला घराचे दरवाजे उघडे व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. तपासणीअंती रोख रक्कम व दागिने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्याने तत्काळ पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलिस निरीक्षक सोमेश्वर शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू करण्यात आ-लेला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
पोलिस तपासात घरातील कपाटाचे कुलूप जबरदस्तीने तोडल्याचे स्पष्ट झाले. अद्याप चोरीस गेलेल्या दागिन्यांची नेमकी किंमत समजू शकलेली नाही. मालकाच्या परतीनंतर त्याबाबत अधिक माहिती मिळणार आहे. ही घटना दिवसा गजबजलेल्या भागात घडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले, शहरातील पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांचा लवकर शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.