पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयातील लेखा विभागात सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त कर्मचा-यांची बोगस नावे लावून १ कोटी ५३ लाखांचा अपहार केला. हा प्रकार स्थानिक निधी लेखा परिक्षण तपासणीत निष्पन्न झाल्याची बातमी 'दै. पुढारी' च्या अंकात प्रकाशित झाली होती. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आज (दि.२७) केली आहे.
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, श्रीहरी ईंगोले, बळीराम गुंडाळे, विठ्ठल जोगदंड यांनी या प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधीत सेवानिवृत्तांचे बोगस नावे टाकून सन २०२२-२३ च्या वर्षात अपहार करुन शासकीय निधीवर दरोडा टाकला आहे. ही बाब लेखा परिक्षणात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी तत्कालीन लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी व गटविकास अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्य़ात आली आहे.