

Himayatnagar Kandli youth murder
हदगाव : हिमायतनगर तालुक्यातील कांडली (बु) येथील 17 वर्षीय नकुल संजय पावडे या तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामसा पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील गणेश संभाजी दारेवाड (वय 39) आणि मुलगा विशाल गणेश दारेवाड (वय 19, दोघे रा. कांडली) यांना अटक केली आहे.
तामसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नकुल पावडे हा 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने वडील संजय पावडे यांनी 27 ऑक्टोबर रोजी तामसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी प्रेमसंबंधातून संतापाच्या भरात नकुल पावडेचा खून करून, त्याचे शव पोत्यात बांधून भोकर तालुक्यातील शिंगारवांडी शिवारातील विहिरीत फेकल्याची कबुली दिली.
पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता विहिरीतून सडलेले शव बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपी विशाल दारेवाड याने नकुल त्याच्या बहिणीला त्रास देत असल्याने हत्या केल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी संजय पावडे यांच्या तक्रारीवरून तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायवैज्ञानिक तज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी नरवटे करीत आहेत.