नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सरेगाव ते हिस्सा पाथरड रस्त्यावर काही ठिकाणी केवळ गिट्टी अंथरून टाकल्याने ग्रामस्थांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी बसलेल्या उपो-षणकर्त्यांच्या तोंडाला केवळ पाने पूसली असल्याची संतप्त भावना प्रहारचे दिव्यांग तालुकाध्यक्ष माधव पांचाळ आणि भास्कर कळणे यांनी व्यक्त केली आहे.
सरेगाव ते हिस्सा पाथरड रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झाल्यानंतर दिव्यांग कार्यकर्ते माधव पांचाळ आणि भास्कर करणे यांनी उपोषण सुरू केले होते. खा. अशोक चव्हाण यांचे पुतणे भाऊराव समूहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन संबंधित रस्त्याचे खड्डे तात्काळ बुजवून देऊ, असे आश्वासन दिल्याने दिव्यांग कार्यकर्ते माधव पांचाळ व भास्कर कळणे यांनी उपोषण मागे घेतले होते.
त्यानंतर रस्त्यावर गिट्टी अंथरली गेली. परंतू रस्त्यावरील खड्डे मजबूतीने बुजविण्याच्या ऐवजी केवळ गिट्टी अंथरल्यामुळे ग्रामस्थांना रस्त्यांवरून चालणेही अवघड झाले आहे. दूध वाहतूक करणारे शेतकरी हरी कळणे गिट्टी वरून घसरून पडल्याने जायबंदी झाले असुन त्यांच्याकडील ४० लिटर दूधही रस्त्यावर सांडले. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भारी म्हणण्याची वेळ वाटसरूंवर आली असून उपोषणकर्त्यांना दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासल्याची भावना निवघा, खांबाळा, धनज, सरेगाव व हिस्सा पाथरड येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
आश्वासन देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसली आहेत. खड्डे मजबुतीने भरता केवळ गिट्टी अंथरल्याने आज रस्त्यावरचा प्रवास जीवघेणा झाला आहे.