

Ramdas Patil leaves the NCP
विशेष प्रतिनिधी
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य नेते पक्षप्रवेश सोहळ्यासाठी शनिवारी नांदेड जिल्ह्यात दाखल होत असताना, देगलूर येथे त्यांच्या पक्षामध्ये फूट पडली. पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी पवारांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येस पक्ष आणि पक्षात वर्चस्व गाजवणारे आ.प्र.गो. चिखलीकर यांना रामराम ठोकला.
दिवाळी सणाचा धुमधडाका थांबताच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय धुमधडाके सुरू झाले आहेत. उमरी आणि देगलूर येथील पक्षप्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार यांचे शनिवारी नांदेडमध्ये आगमन झाले. शुक्रवारी त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची तयारी सुरू असताना, देगलूर-मुखेड या तालुक्यांत चांगला प्रभाव निर्माण करणाऱ्या पाटील-सुमठाणकर यांनी पक्षातील पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षामध्ये खळबळ उडाली.
सुमठाणकर यांनी काही जसरी महिन्यांपूर्वी 'राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी मजबूत संघटन उभे केले. या दोन्ही पक्षांकडून निराशा झाल्यानंतर ते येत्या २८ ऑक्टोबर रोजी देगलूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सुमठाणकर यांनी शासकीय सेवेदरम्यान देगलूर नगर परिषदेत मुख्याधिकारीपद भूषविले होते.
काही माजी नगराध्यक्ष, नगर-सेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह ते कॉंग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौऱ्यातील पहिला कार्यक्रम उमरी येथे झाला. आधी ठरल्याप्रमाणे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र शिरीष आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्यासह त्यांच्या उमरी गोरठा परिसरातील अनेक समर्थकांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा गट वर्षभरा पूर्वी खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील पक्षात गेला होता. आता त्यांनी काकांचा हात सोडून पुतण्याला साथ देण्याचे ठरवले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याकडे उमरी तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यांना विश्वासात न घेता गोरठेकर गटाचा प्रवेश घडवून आणण्यात आला.
देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी अलीकडे नागपूर येथील कार्यक्रमात 'राष्ट्रवादी' मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर देगलूरमधील खा. शरद पवार यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पक्षामध्ये उडी मारली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, नांदेडमध्ये महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये पक्षविस्तार तसेच वरील संस्थांमध्ये अव्वल स्थान राखण्याची स्पर्धा, चढाओढ सुरू झाली असून भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांना 'राष्ट्रवादी'कडून लक्ष्य केले जात आहे. उमरी येथील भाषणांत आ. चिखलीकर यांनी खा. चव्हाण यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. तत्पूर्वी चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री चिखलीकरांच्या प्रभावक्षेत्रात भाजपाचा मेळावा घेतला.
हर्षवर्धन सपकाळ मंगळवारी नांदेडमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा नांदेड दौरा शनिवारी पार पडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या मंगळव ारी (दि. २८) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत देगलूर येथील मोंढा मैदानावर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सपकाळ नंतर नायगाव आणि तेथून नांदेडमध्ये येणार आहेत. नांदेडमध्येही पक्ष कार्यालयात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.