

उमरी: सायकल, मोटारसायकल आणि कार चोरीला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या. पण नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यातील बोळसा बुद्रुक गावातून एका रात्रीत चक्क दोन ट्रॅक्टर चोरीला गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरी होऊन २४ तास उलटून गेले तरी ट्रॅक्टरचा तपास लागलेला नाही, त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हे नवीन संकट कोसळले आहे.
बोळसा बुद्रुक येथील शेतकरी आनंदा धोंडीबा आपुलवाड (ट्रॅक्टर क्र. MH26 BQ 2162) आणि पंडित गणपत वडजे (ट्रॅक्टर क्र. MH26 CP 3761) यांचे ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर उभे होते. बुधवारी (दि.०५) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरला लावलेले सोयाबीन काढणीचे हल्लर मशीन बाजूला काढून ठेवून, दोन्ही ट्रॅक्टर चोरून नेले.
एका ट्रॅक्टरची किंमत अंदाजे दहा लाख रुपये असून, दोन्ही ट्रॅक्टरची मिळून अंदाजे २० लाख रुपयांची किंमत आहे. एकाचवेळी दोन ट्रॅक्टर चोरीला जाण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये आता या ट्रॅक्टर चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सूर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावून ट्रॅक्टर परत मिळवावे, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.