उमरखेड : उमरखेड येथून ५ किलोमिटर अंतरावरील चुर दगडथर- फुलवावंगी रस्त्यावरील चुरमुरा जंगलातील दरीत एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्युदेह रविवारी (दि.१३) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमीत प्रभाकर सोळंके (वय,२३,रा, जि,प काॅलनी उमरखेड) असे या तरूणाचे नाव आहे.
चुरमुरा गावापासून ३ कि.मी. अंतरावर दगडथर रस्त्यावरील एका दरीत मृत्युदेह असल्याची माहिती उमरखेड पोलिसांना चुरमुरा येथील पोलिस पाटील नारायण पवार यांनी दिली. त्यावरुन पोलिस ताफा घटनास्थळी पोहचला. हा मृत्युदेह अंदाजे २३ वर्षीय युवकाचा असून त्याच्या मानेवर मोठमोठे घाव असल्याचे निदर्शनास आले. मृत युवक हा चुरमुरा गावचा नसल्यामुळे त्याची प्रथमत; ओळख पटली नसल्याने त्याचा मृत्युदेह नेमका या जंगलात कसा आला याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसा समोर होते . दरम्यान काल सकाळी सुमीत प्रभाकर सोळंके (वय,२३,रा, जि,प काॅलनी उमरखेड) हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी उमरखेड पोलिस ठाण्यात केली होती . त्यावरून तपास केला असता, त्याच्या कपड्यावरून मृत हा सुमीतच असल्याची ओळख पटली.
पोलिसांना मृत सुमीतच्या गळ्यावर, मानेवर घाव दिसून आल्याने सुमीतचा मृत्यू हा घातपाताने कि जंगलातील हिंसक प्राण्यांच्या हल्यामुळे झाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर उमरखेडचा सुमीत आडवळणाच्या जंगलात काय करत होता? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे . घटनेची माहिती मिळताच ए.पी.आय निलेश सरदार, बिट जमादार मोहन चाटे , पोहेकॉ. दिनेश चव्हाण, गजानन गिते, गजान आडे घटनास्थळी पोहचून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृत्यूदेह हा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
सुमीत हा फुड टेक्नोलॉजीचे अंतिम वर्षाचे शिक्षण हे अमरावती येथे घेत होता. नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा तपास पोलिस घेत आहेत.२३ वर्षीय सुमीतच्या मृत्यूमुळे शहरातील तरुणांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात माहिती मिळताच एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक शहरात दाखल झाले तर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी ताफ्यासह भेट दिली .