

Takli Bu Khairgaon village Epicenter
नायगाव : नायगाव तालुक्यातील टाकळी बु. परिसरात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर रोजी) भूगर्भातून आवाज येऊन धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थ घाबरून घराबाहेर पडले. प्रारंभी प्रशासनाने हे धक्के भूकंपाचे नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आता सेस्मिक नोंदींनुसार तो भूकंपच असल्याचे समोर आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपमापक यंत्रणेत टाकळी – खैरगाव परिसर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे २.३ व १.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ९ वाजता अशा वेगवेगळ्या वेळेस भूगर्भातून आवाजासह जमिन हलल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. प्रशासनाने तत्काळ या घटनेची दखल घेतली, मात्र त्या वेळी अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही नोंद दिसून आली नव्हती.
यानंतर विद्यापीठाच्या सेस्मिक केंद्रात मिळालेल्या नोंदींचा अभ्यास करण्यात आला आणि हा प्रकार भूकंपाचा असल्याचे निश्चित करण्यात आले. या घटनेनंतर टाकळी बु. आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासन व तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घाबरू नये, पण योग्य खबरदारी घ्यावी. पुन्हा असा प्रकार जाणवल्यास तात्काळ घराबाहेर येऊन खुल्या जागेत उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भोकर तालुक्यातही भूगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नोंदविण्यात आले होते.