

नायगाव : ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नायगाव तालुका आणि शहरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते. या पुरग्रस्त ७२४ कुटुंबांचे अन्नधान्य, कपडे, आणि जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान होऊन महिना उलटला तरी मदत मात्र मिळाली नव्हती. प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत होती.
मात्र अखेर ही दिरंगाई दूर झाली असून, नायगाव शहरातील या सर्व ७२४ कुटुंबांना शासनाकडून मदत वाटपाला बुधवारपासून (दि.८) सुरुवात झाली आहे. प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, यासाठी ७२ लाख ४०० रुपये इतकी रक्कम बँकेत वर्ग केल्याची माहिती नायब तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.
नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील १४०० कुटुंबांना या आधीच मदत मिळाली होती. मात्र शहरातील सातशे चौवीस कुटुंबांना मदत न मिळाल्याने त्यांचा दसरा आनंदात साजरा झाला नाही, तसेच येणारी दिवाळीही काळोखात जाईल, अशी भिती निर्माण झाली होती. नगरपंचायतीने सर्वेक्षणातील त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याने मदत वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मुख्याधिकारी श्रीमती गंधाली पवार यांनी सांगितले की, “पुरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून नगरपंचायतीकडून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे मदत वितरणाचा अडथळा आता दूर झाला आहे.” या निर्णयामुळे पुरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांची दसरा जरी दुःखात गेला तरी दिवाळी आता गोड होणार आहे.
कापड, किराणा, होम अप्लायन्सेस, सलून, टेन्ट, ऑटोमोबाईल, वेल्डिंग आदी दुकानांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक व्यापाऱ्यांचे मालसाठे नष्ट झाले, मशीनरी निकामी झाली, तर काहींच्या दुकानांचे बांधकामही धोक्यात आले. याबाबत अद्याप संपूर्ण पंचनामा पूर्ण न झाल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. “गृहस्थांना मदत मिळाली, पण व्यावसायिकांचे काय?” हा प्रश्न आता नायगावातील व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे.