नायगाव : ई-पीक पाहणी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज (दि.२२) नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी व कर्मचारी काही काळ कार्यालयातच अडकून पडले होते.
नायगावच्या डॉ. हेडगेवार चौकातून निघालेला शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यात शेतकऱ्यांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी ई-पीक पाहणी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी, २०२३ चा पिक विमा सरसकट देण्यात यावा, तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, सिबिलची अट रद्द करण्यात यावी, ७/१२ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशा विविध मागण्यांचे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.