श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रुई येथे शेतीच्या वादातून परवेझ पंटूस देशमुख (वय २१) यांचा त्याच्या चुलत भावाने विळ्याने वार करून खून केला होता. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी नऊच्या सुमारास घडली होती. खून करणाऱ्या साहिल बबलू देशमुख या चुलत भावाला पोलिसांनी गुरूवारी (दि.२२) अटक केली असून खून प्रकरणातील आणखी एक साथीदार अजूनही फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देशमुख भाऊबंदकीमध्ये अनेक दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी गावातील पोलीस पाटील यांच्या घरी बैठक घेतली. यावेळी संरपंचांसह गावकरीही उपस्थित होते. बैठक संपल्यावर सोहेब बबलू देशमुख याने परवेझ यास पाठीमागून पकडले व साहिल देशमुख याने हातातील लोखंडी विळ्याने त्याच्या छातीवर वार केले. या हल्ल्यात परवेझचा मृत्यू झाला.
त्यानंतर साहिल आणि सोहेब दोघेही फरार होते. त्यांचा पोलिसांकडून तपास सुरू होता. गुरूवारी पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, आशिष डगवाल, परमेश्वर कनकावार व गृहरक्षक दलाचा जवान आकाश गिनगुले यांच्या पथकाने हल्लेखोर आरोपी साहिल याला किनवट येथून ताब्यात घेतले. सोहेब देशमुख हा दुसरा आरोपी अजूनही फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.