

लोहा : लोहा शहरात दुपारच्या सुमारास घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहे. अक्षय गोविंद उंडाडे (वय २८) हा तरुण विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडला. अक्षय हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि पत्रकार गोविंद उंडाडे यांचा धाकटा मुलगा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच तो लोह्यात आला होता. मंगळवारी तो बहिणीकडे पूर्णा येथे गेला होता. बुधवारी सकाळी वडील शेतात नसल्याने तो एकटाच शेतात गेला. गवत घेत असताना अचानक विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याला जोराचा शॉक बसला. घटनास्थळाजवळ असलेल्या नातेवाईकांनी आवाज ऐकून तत्काळ धाव घेतली आणि अक्षयला दुचाकीवरून लोहा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
उंडाडे कुटुंबात केवळ चार महिन्यांत ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अक्षय उंडाडे यांच्यावर गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता लोहा शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.