

'Krushi Samruddhi Yojna' is the foundation of income growth
किनवट, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेती अधिक आधुनिक, शाश्वत आणि नफा देणारी करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'कृषी समृद्धी योजना' सन २०२५-२६ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, पीक विविधीकरणास चालना देणे, तसेच हवामान अनुकूल आणि मूल्यवर्धित शेतीचा विस्तार घडवून आणणे, हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. या योजन-'तील विविध घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किनवट यांच्याकडे अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले आहे.
कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पादनवाढ आणि शाश्वततेसाठी आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. हवामान अनुकूल बियाण्यांचा वापर, जमिनीची सुपीकता वाढविणे, पिकांचे वैविध्य निर्माण करणे, यांत्रिकीकरणास चालना देणे, डिजिटल शेती आणि मूल्य साखळी मजबूत करण्यावर योजनेचा भर आहे. तसेच कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेस, साठवणुकीस आणि निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून शेतीला व्यापारी व स्पर्धात्मक स्वरूप देण्याचे उद्दिष्ट आहे.
ही योजना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, जमातीतील तसेच दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी 'महाडीबीटी' संकेतस्थळावर ((https://mahadbt.maha-rashtra.gov.in/farmer)) ऑनलाईन अर्ज करावेत. योजनेतील घटकांसाठी प्रथम अर्ज करणारास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर लाभ देण्यात येणार असल्याने इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
किनवट तालुक्यात या योजनेअंतर्गत एकात्मिक खत व्यवस्थापन, बीज प्रक्रिया संच, किसान ड्रोन योजना, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बीआरसी) स्थापन करणे, काढणीनंतर व्यवस्थापनासाठी गोदाम बांधकाम, शेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र, तसेच चिया आणि मका पीक प्रात्यक्षिक, कॉटन श्रेडर आदी विविध घटकांचा समावेश आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे उद्दिष्ट
या योजनांच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविणेच नव्हे, तर शेती क्षेत्रात रोजगारनिर्मिती, कृषीउद्योगांना चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हेही उद्दिष्ट आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले आहे.