

Direct FIR if the photo or name of the criminal is found on the banner
नांदेड, पुढारी वृत्तसेवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्ताने शहराच्या कुठल्याही भागात पोस्टर किंवा बॅनरवर गुन्हेगाराचे नाव किंवा फोटो आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. यामुळे भविष्यात बॅनरवरच्या फोटोंची संख्या मात्र कमी होणार आहे.
पुण्यामध्ये अलिकडच्या काळात गुन्हेगारांना राजाश्रय मिळाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. राजकीय पाठबळावरच दिवसेंदिवस मोठ्या शहरामध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता त्याचे लोण छोट्या शहरातही पोहचू लागले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनरवर गुन्हेगारांची नावे व फोटो झळकत असल्याने गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी अनधिकृत बॅनरविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. चौकाचौकात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहेत.
एखाद्या नेत्याचा कार्यक्रम, वाढदिवस असला की रातोरात बॅनरची संख्या वाढते. त्याच बॅनरवर अनेक गुन्हेगारांची नावे ठळकपणे छापली जातात. शिवाय फोटोही लावले जातात. आता अशांना पोलिसांच्या इशाऱ्यामुळे चाप बसणार आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी ज्या गुन्हेगारांची नावे किंवा फोटो दिसतील अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना शहरातील सहा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील अधिका-यांना दिले आहेत.
पोलीस अधिक्षकांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. पोलीस अधिक्षकांच्या या नव्या सूचनाचे किती प्रभावीपणे अंमलबजावणी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.