

हिमायतनगर : तालुक्यातील धानोरा शिवारात गावठाण डिपीवरील आर्थिंगची तार तुटून शॉक लागल्याने शेतात काम करणारा बैल जागीच ठार झाला असून, दुसरा बैल आणि औत हाकणारा सालगडी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप करत तातडीने मदत आणि उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
घटनेचा तपशील असा की, धानोरा येथील शेतकरी अर्पित मुन्नालाल जैस्वाल यांच्या गट क्रमांक 204 मधील शेतात 4 जुलै रोजी दुपारी औत चालू असताना, गावठाणमधील डिपीवरील मुख्य आर्थिंगची तार अचानक तुटून जमिनीवर पडली. त्याचवेळी औताला जुंपलेल्या बैलाचा पाय या तारेवर पडताच एक बैल जागीच मृत्युमुखी पडला, तर दुसरा बैल व सालगडी गंभीर जखमी झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शेतकऱ्यांनी याचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शिवारातील वीजपुरवठा करणाऱ्या पोलवरील तारा गेल्या २५ वर्षांपासून दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी तारांमध्ये झुकलेपण आणि लोंबकळलेल्या तारा दिसून येत आहेत. वादळी वाऱ्यांमुळे या तारा जमिनीवर कोसळत असून जनावरांसह माणसांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांनी महावितरणचे अभियंते व वायरमन यांना वारंवार याबाबत माहिती दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, आज एका निष्पाप बैलाचा बळी गेला असून शेतकऱ्याला जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.