नांदेड : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि. २३) रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक दिली आहे. सकल मराठा समाज बांधवांनी शनिवार (दि.२१) रोजी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, हैदराबादसह सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट लागू
करावे, आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, कुणबी नोंदी तपासणीची गती वाढवावी, कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी (१७ सप्टेंबर) पासून सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.
उपोषणादरम्यान जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली असून शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाच्या मागण्या दोन दिवसांत मान्य न झाल्यास सोमवार (दि. २३) रोजी नांदेड जिल्हा बंद करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले आहे.