

24 children in Nanded to undergo heart surgery
विशेष प्रतिनिधी
नांदेड : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत येथे घेण्यात आलेल्या एका शिबिरात हृदयरोग जडलेल्या ९५ बालकांची नुकतीच तपासणी करण्यात आली. त्यांतील २५ टक्के म्हणजे २४ बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निदान वरील तपासणीतून झाले.
राज्यामध्ये शालेय स्तरावर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरत असल्याचे आरोग्य व अन्य संबंधित विभागांच्या निदर्शनास आले आहे. कुपोषणाच्या गंभीर प्रश्नांतून होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या मार्फत ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी केली जात आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात नुकत्याच झालेल्या एका शिबिरासाठी मुंबईच्या बालाजी रुग्णालयातील लहान मुलांच्या हृदयरोगातील तज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा आणि या रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतीक मिश्रा नांदेडमध्ये आले होते.
हृदयाशी संबंधित वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेल्या ९५ बालकांना या शिबिरात आणून त्यांची आधुनिक यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. त्यानंतर २४ बालकांच्या हृदयावर ऑगस्ट महिन्यात मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. या बालकांच्या पालकांना त्याबाबत अवगत करण्यात आले.
वरील शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ गुट्टे यांच्या पुढाकारातून पार पडले. यावेळी संबंधित विभागाचे काही प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.