लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर येथील पंकज लॉजवर लातूर पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक प्रतिबंधक शाखेने छापा टाकून ३ महिलांची सुटका केली. वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ५ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावाजवळील पंकज लॉजमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. तेथील हॉटेल मालक व मॅनेजर काही महिलांना हॉटेलवर आणून वेश्या गमनासाठी एजंट करवी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत असेही कळाले होते.
खातरजमा करून एक बनावट ग्राहक वेश्या गमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून पंकज लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर गावाहून आणलेल्या ३ महिला मिळून आल्या तर लॉज मालक, मॅनेजर, एजंट यांना लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे. विकास बापूसाहेब पडवळ (वय 47 रा कातपूर), बालाजी नागोराव देवकते, (वय 30 रा कातपूर), अभिषेक सूर्यवंशी (रा शिवनी). (फरार), बाळासाहेब नागनाथ जाधव, (रा. कातपुर) अजय रत्नाकर कांबळे,(वय 25 रा सताळा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माकोडे हे करीत आहेत.