

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात पावसाला थांबून जवळपास आठवडा झाला असला तरी शिरूर अनंतपाळ ते फुलमळा मार्गे येरोळ जाणारा प्रमुख रस्ता अद्यापही रहदारीसाठी बंद आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास प्रशासन अपयशी ठरल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.मोठ्या पावसामुळे येथील रस्ता वाहून गेला. रस्ता नसल्यामुळे दळनवळनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हा रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांपासून ते रोजंदारी करणाऱ्या मजुरांपर्यंत साऱ्यांचेच हाल सुरू आहेत. विशेष म्हणजे तालुक्यात खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि अधिकारी अशी मोठी फौज असतानाही अद्याप रस्ता सुरू करता न आल्यामुळे "वळींबा नसून खोंळबा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचा हा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला असून, नागरिक आता सरळसरळ जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर सवाल उपस्थित करत आहेत. पावसाचे कारण देऊन एक दोन दिवस रस्ता बंद राहणे समजू शकते, मात्र आठवड्यानंतरही तो पूर्ववत न होणे ही गंभीर बाब आहे. "रस्ता त्वरित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा" काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नावर अजून मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.