

Shirur Anantpal Talathi inquiry
शिरूर अनंतपाळ : तलाठ्याने २५ वर्षांपूर्वी न्यायालयाने स्थगित केलेल्या खरेदी खतावर फेरफार करून शेतजमिनीत बदल केल्याचा गंभीर आरोप शेतकरी राहुल व्यंजने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, शिरूर अनंतपाळ यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
राहुल व्यंजने हे शिरूर आनंदपाल येथील रहिवासी असून, त्यांनी सर्वे नं. 14/14 मधील फेरफार क्रमांक 71/52 बाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी आर. एस. पाटील यांनी २००१ मध्ये न्यायालयाच्या स्पष्ट मनाईनंतरही दस्त क्र. 4125, दिनांक 5 डिसेंबर 2001 रोजी दाखल केलेले वाटणी पत्र आणि खरेदी खताच्या आधारे फेरफार केला.
विशेष म्हणजे, हा खरेदी व्यवहार दिवाणी न्यायालय, वरिष्ठ निलंगा यांनी दिवाणी दावा क्रमांक 95/2002 मध्ये स्थगित केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत महसूल विभागाने फेरफार नोंदणी केली. मंडळ अधिकारी आणि सध्या कार्यरत तलाठी रामलिंग पाटील यांनीदेखील फेरफार करताना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा किंवा पडताळणी न करता हा बदल नोंदविला असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे.
या प्रकरणाची चौकशी करून अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरिक सेवा व अपील कायदा 1979 अंतर्गत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना एका अधिकृत पत्राद्वारे दिले आहेत.
राहुल व्यंजने यांनी आपल्या तक्रारीच्या मागणीसाठी 29 सप्टेंबर 2025 रोजी उपोषणही केले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तलाठ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागातील मनमानी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवहेलनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.