लातूर, पुढारी वृत्तसेवा: आंदोलने करुनही सरकार मराठा समाजास आरक्षण देत नाही. व शेतीतूनही संसारगाडा चालत नाही. यामुळे व्यतीत झालेल्या अहमदपूर तालुक्यातील हसरणी येथील ज्ञानोबा मारोती तिडोळे (वय ३८) यांनी तणनाशक पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनातील खदखद त्यांनी आपल्या पत्नी चंचलबाई यांना सांगितली व त्यांनीही तुम्ही नसला तर माझ्या जगण्याला काय अर्थ ? असे सांगत त्याच बाटलीतील विष तिनेही पिले. गुरुवारी (दि.२६) रोजी सकाळी ही घटना निर्दशनास आली. सध्या अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात या पती-पतीनीवर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.
ज्ञानेबा तिडोळे हे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांना अवघी दीड एकर जमीन आहे. दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा त्याच्या आजोळी शिक्षण घेतो. शेतीतून तुटपूंजा उत्तपन्नावर खर्च भागत नसल्यामुळे ज्ञानेबा हे ट्रकचालक म्हणून काम करतात. महिनाभर बाहेर राहून आठ दिवस गावी येतात. दरम्यान ते गावी आले होते. अहमदपूर येथे मराठा आरक्षणासाठी जयराम पवार हे उपोषण करीत होते. या कालावधीत ज्ञानेबा दररोज तेथे जात होते. उपोषणकर्ते पवार यांचे हातापाय चोपत होते. मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. समाजही लढा देत आहे.
गरजवंत मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे हे सारे खरे असताना सरकार खोटेपणा का करीत आहे,? आरक्षण का देत नाही असे ते म्हणत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने त्यांच्या शेतातील सोयाबीन हातचे गेले होते. या साऱ्यानी ते खचले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी त्यांच्या घरी असेलेले तणनाशक पिले व त्यांच्या पत्नीनेही त्यांचे अनुकरण केले. सकाळी हे सारे त्यांच्या आई व शेजाऱ्यांना आढळून आले. अत्यावस्थ असलेल्या या दांपत्यास उपचारार्थ त्यांनी अहमदपूर येथे रुग्णालयात दाखल केले.