विवाहितेच्या लग्नापूर्वी असलेल्या तिच्या मित्राने त्याच्या साथीदारासह तिच्या पतीचा खून केला. अनिल गोविंद जाधव आणि त्याच्या साथीदार सुशिल संतोष पवार (दोघेही रा. चिंचोलीराव ता.जि. लातुर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ ऑगस्ट रोजी चिंचोलीराव शिवारात चिंचोलीराव ते गंगापुर जाणाऱ्या रोडच्या बाजुच्या खडयात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तो औसा तालुक्यातील अलमला तांडा येथील अजय नामदेव चव्हाण, (वय 25) याचा असल्याचे समजले. मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीकांत मोरे व पोलिस पथके अज्ञात आरोपीचा शोध घेत होती.
दरम्यान नरवाडे यांना तपासात मयताच्या पत्नीचा लग्नापूर्वीचा मित्र अनिल गोविंद जाधव व त्याच्या साथीदार सुशिल संतोष पवार यांनी हा खून केल्याची शंका आली व त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. अनिल जाधव याने त्याचा मित्र संतोष पवार याच्या मदतीने अजय चव्हाण याचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.