वडीगोद्री : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणार्याला कायमचे तुरुंगात टाका, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करावी; अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. आपण रविवारी, (दि. 1) राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला 29 ऑगस्ट रोजी वर्ष होत आहे. मराठा आरक्षण लढाईची वर्षपूर्ती म्हणून गोदापट्ट्यातील 123 गावांतील मराठा समाजाची बैठक अंतरवाली सराटी येथे होत आहे. वर्षभरात मराठा आरक्षण आंदोलनातून समाजाला झालेले फायदे-तोटे यावर चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.