कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना हिंगोली - नांदेड बायपास रोडवर कळमनुरी येथे आज ( दि.३०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. सोपान साहेबराव ठेंगल (वय २२, रा. वारंगा मसाई) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी शहरातील धानोराजवळील बायपास रोड च्या बाजुस ट्रॅक्टर बाजूला लावून सोपान मित्रासोबत बोलत उभा होता. यावेळी अज्ञात भरधाव वाहन हिंगोलीवरून नांदेडच्या दिशेने येत होते. या वाहनाने सोपानला जोराची धडक दिली. यात तो हवेत उडून समोर असलेल्या नादुरुस्त ट्रक वर धडकून जमिनीवर आपटला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, जमादार दिलीप पोले, रामा शेळके, राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने, उमर शेख, राठोड, सोपान थिटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.