हिंगोली : तालुक्यातील माळसेलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.9) सकाळच्या सुमारास एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले होते. मात्र गावकऱ्यांनी वेळीच या प्रकाराची माहिती शिक्षण विभागाला दिल्याने या शिक्षकाने शाळेतून काढता पाय घेतला. या प्रकरणात शिक्षण विभागाने तातडीने अहवाल मागवला असून त्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंत शाळा आहे. सकाळच्या सुमारास शाळेतील एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. सदर शिक्षकाला व्यवस्थित चालताही येत नव्हते. तर त्याने एका गावकऱ्यासोबत शिवीगाळ देखील केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सदर शिक्षक शाळेत आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने. तर कधी आपण दारु पिलोच नाही असे सांगत हातवर केले.
याप्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनीच एक निवेदन तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविले. या प्रकाराची सर्वत्र वाच्यता होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर शिक्षकाने शाळेतून काढता पाय घेतला. या प्रकाराची हिंगोली तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
या संदर्भात शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता सदर शिक्षकाबाबत गावकऱ्यांनी माहिती कळविली आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने शाळेत जाऊन सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.