

जवळाबाजार: निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच, शासनाकडून हमी भावाने माल खरेदी करणारी केंद्रे (CCI आणि Nafed) सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांना आपला उत्पादित माल नाईलाजाने कमी दरात आडत बाजारपेठेत विकावा लागत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या आसपास सुरू होणारी खरेदी केंद्रे यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी सुरू झालेली नाहीत. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत, हमी भावात माल विकल्यास रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते घेण्यासाठी थोडा आधार मिळाला असता. आज, २ नोव्हेंबर रोजी, येथील आडत बाजारपेठेत कापूस 7150 रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीन 4425 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आले. हा दर शासनाच्या हमीभावापेक्षा कमी आहे.
परिसरातील सुमारे 50 ते 60 गावांमधील शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे व खत खरेदी करण्याकरिता नाइलाजाने आपला कापूस आणि सोयाबीन कमी दरात विकत आहेत. त्यामुळे आता शासनाच्या खरेदी केंद्रांना कधी मुहूर्त मिळणार, याची शेतकरी बांधवांना मोठी प्रतीक्षा आहे, जेणेकरून त्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळू शकेल.