कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका येथे चार चोरट्यांनी भुसार व्यापाऱ्याचे हातपाय बांधून घरात चोरी केली. घरातील कपाट फोडून १ लाख रुपये रोख व सुमारे १४ तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि. २) पहाटे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कनेरगावानाका येथील भुसार व्यापारी पुरुषोत्तम बाहेती हे रविवारी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिले असता कोणीही दिसले नाही. त्यानंतर ते घरात येताच घरात शिरलेल्या चार चोरट्यांनी त्यांना चाकू, गुप्तीचा धाक दाखवून आवाज निकालना नही असे धमकावले. चोरट्यांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. मारहाणीच्या भितीमुळे बाहेती यांनी पैसे कुठे ठेवले ते दाखवले. चोरट्यांनी एक लाख रुपये ताब्यात घेतले. त्यानंतर घरातील दोन कपाट फोडून त्यातील सुमारे १४ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन घराला बाहेरून कडी लाऊन चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. पावसामुळे श्वान पथक जागेवरच घुटमळले. या प्रकरणी अद्याप बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मिठू बोने, बासंबा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.