

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या तसेच त्यांच्या काकांच्या घरकुलाच्या देयकावर स्वाक्षरीसाठी पाच हजाराची लाच घेताना ग्रामसेवक मोहन जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आडोळ येथील एका तक्रारदाराची सिंचन विहीर पूर्ण झाली आहे. या विहिरीच्या कुशल देयकाचा ९९ हजार रुपयांचा अखेरचा हप्ता देणे बाकी होते. या शिवाय त्यांच्या दोन काकांच्या घरकुलाच्या कुशल देयकावरही ग्रामसेवक जाधव याची स्वाक्षरी आवश्यक होती. त्यानुसार तक्रारदाराने ग्रामसेवक जाधव याच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठपुरावा केला. मात्र जाधव याने आठ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर पाच हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनुस, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलीक, राजाराम फुफाटे, गजानन पवार, तान्हाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, योगिता अवचार, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने सेनगाव येथील ग्रामसेवक जाधव याच्या रुमजवळ सापळा रचला होता.
त्यानंतर तक्रारदार स्वाक्षरी घेण्यासाठी गेला असता पेमेंट आणले का अशी विचारणा केली. यावरून पाच हजार रुपये खोलीतील फरताळावर ठेवण्यास सांगितले. रक्कम ठेवल्यानंतर ग्रामसेवकाने रक्कम घेताच त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ग्रामसेवक मोहन जाधव हा याआधी औंढा नागनाथ तालुक्यात कार्यरत होता. त्या ठिकाणीही सन 2015 मध्ये त्याने लाच घेतल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता हा दुसरा गुन्हा आहे.