आखाडा बाळापूर : मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शिक्षण घेऊनही नोकऱ्या लागत नाहीत. या नैराश्यातून कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील तरूणाने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. संतोष पांडुरंग दुर्गे (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कान्हेगाव येथील रामन पांडुरंग दुर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष पांडुरंग दुर्गे यांचा मराठा आरक्षणात सक्रिय सहभाग होता. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे तो सतत नैराश्यामध्ये होता. या नैराश्यातून त्याने सोमवारी शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार विष्णुकांत गुट्टे, फौजदार बसवंते, जमादार रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.