

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी शिवारातील एका शेततळ्यात ३० वर्षीय युवकाने उडी मारून जीवन संपवल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी समोर आली.
या घटनेबाबत माहिती अशी की, खामगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी शेख यासीन शेख आश्रफ हा ट्रकवर क्लीनर म्हणून नोकरीस होता. नांदेड येथे ट्रकमधील माल उतरवल्यानंतर खामगावकडे जात असताना, कळमनुरी बायपासवरील असोलवाडी फाट्याजवळ त्याने ट्रक ड्रायव्हरला सोडून गाडी सोडली.
संबंधित ड्रायव्हरने ही घटना यासीनच्या नातेवाईकांना कळविली. यासीन काही काळाने दिसून न आल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये यासीन मिसिंग असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी असोलवाडी शिवारातील शेततळ्यात युवकाचे प्रेत असल्याची माहिती पोलीसांना दिली. ही माहिती मिळताच, कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे आणि बीटजमादार देविदास सूर्यवंशी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला, तर शेततळ्यातून समशेर पठाण व अप्पाराव कदम यांनी मृतदेह बाहेर काढला.
पुढील तपासात मृतदेहाची ओळख शेख यासीन शेख आश्रफ अशी झाली. त्यांचा मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
सध्या, शेख यासीन शेख आश्रफ यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही आणि पोलीस तपास सुरू आहे.