हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
भाजपाचे माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आज (बुधवार) पुणे येथे महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. जिल्ह्यातील बंधार्यांच्या प्रश्नावर विधानसभेत पोहोचण्यासाठी आपण हा पक्ष प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, माने हे मंगळवारीच भाजपच्या सेनगाव येथे पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात उपस्थित होते. तर बुधवारी त्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला. माने यांनी यापुर्वी अनेकदा पक्षांतर केल्याने त्यांच्या पक्षांत्तराचे एक वर्तुळ पुर्ण झाले आहे.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजी माने हे शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळेस लोकसभेत पोहोचले होते. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाही. त्यानंतर त्यांनी भाजपाला जवळ केले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर रान उठवले होते. सापळी धरण रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवला होता. हिंगोली जिल्ह्याची वाहिनी असलेल्या कयाधू नदीवर बंधारे बांधून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी मागील अनेक वर्षापासून लावून धरली होती. यासाठी त्यांनी तत्कालीन राज्यपालांसह राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बंधार्याचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी त्यांना बंधार्याचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. सध्याच्या महायुती सरकारच्या काळातही त्यांनी हा प्रश्न मांडला होता, मात्र या सरकारनेही त्यांना आश्वासनेच दिली. जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडून आश्वासने दिली जात असल्याने माने मागील काही दिवसांपासून नाराज झाले होते. बुधवारी पुणे येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला आहे. यावेळी त्यांचा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माने म्हणाले की, जिल्ह्यातील बंधार्यांच्या प्रश्नावर ठाकरे सरकार तसेच शिंदे सरकारने आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. कयाधू नदीचे पाणी ईसापूर धरणामध्ये वळवून नांदेडकडे नेले जात आहे, मात्र या प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. त्यामुळेच आपण विधानसभेत जाऊन हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यात परिवर्तन करायचे असून त्यांच्या परिवर्तनाला साथ देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण या पक्षात प्रवेश घेतला आहे. या पक्षाच्या माध्यमातून आपण हिंगोली किंवा कळमनुरी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत असे जाहीर केले.