गोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरात काल (रविवार) रात्रीपासुन जोरदार पाऊस पडत आहे. कोरडे ठाक पडलेल्या नदी नाल्यांना यामुळे पूर आलेला आहे. या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे, तर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
गोरेगाव गेल्या पंधरा दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिली होती, मात्र गोरेगावसह परिसरात पोळा सणाच्या पुर्वसंध्येला काल (रविवार) रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपले आहे. आज दिवसभरात वरुणराजाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे. त्यामुळे गोरेगाव येथील गौरी गंगा नदीला पूर आला आहे.
नदी, ओढ्याच्या काठावरील जमिनी अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत. नुकत्याच सोयाबीन पिकांना कळ्या फुले पापड्या आहेत, तर कापुस पिकांना ही मोठ्या प्रमाणात फुले लागली आहेत. या संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यात उत्पादन घटणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाने तातडीने शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.