

Hingoli Body of a young man found on the railway track
वसमत, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वसमत ते चोंढी रेल्वे मार्गावर गुरुवारी एका युवकाचा मृतदेह आढळला. अधिक चौकशीमध्ये सदरील युवक कुरुंदा येथील असल्याचे स्पष्ट झाले असून भाऊबीजेच्या दिवशी एकुलता एक भावाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर को सळला आहे.
वसमत ते चोंढी रेल्वे मार्गावर एका युवकाचा रेल्वेने कटलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती परिसरातील गावकऱ्यांना मिळाली होती. गुरुवारी सकाळच्या सुमारास मृतदेह आढळला. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वसमत शहर पोलिसांना दिली.
वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, इम्रान कादरी, अजय पंडित, शेख नय्यर, गजानन भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी गाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी अनोळखी युवकाच्या मृतदेह आढळला तर मृतदेहाच्या बाजूलाच एक बॅग दिसून आली.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये एका चिठ्ठीवर मम्मी पप्पा असे नाव लिहून मोबाईल क्रमांक दिसून आला. पोलिसांनी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. नातेवाइकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर सदर युवक वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील विघ्नेश बालाजी म्याकेवार (१५) हा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सदर मृतदेह वसमत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दुपारी चार वाजता मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला.
विघ्नेश म्याकेवार हा घरामध्ये एकुलता एक मुलगा होता त्याला दोन बहिणी असून भाऊबीजेच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.