हिंगोली : ‘आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम’ : वसमत तालुक्यातील गावातील नागरिकांची घोषणा

हिंगोली : ‘आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम’ : वसमत तालुक्यातील गावातील नागरिकांची घोषणा
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देत वसमत तालुक्यातील कौठा येथे ईव्हीएम मशीन संदर्भातची माहिती व मतदार जनजागृतीवर आधारीत शासनाचा नियोजित कार्यक्रम आज (दि. १५) ग्रामस्थांनी थांबविला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारने कोणताही शासकीय कार्यक्रम गावात घेऊ नये, असे म्हणत ग्रामस्थांनी शासकीय कार्यक्रमांना विरोध दर्शविला.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दोन दिवसांपासून आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या सुचनेनुसार ग्रामीण भागात कार्यक्रम घेतले जात आहेत. ठरल्याप्रमाणे आज (दि.१५) वसमत तालुक्यातील कौठा येथे सकाळी दहा वाजेदरम्यान पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे काही कर्मचारी ईव्हीएम मशीन संदर्भात माहिती देण्यासाठी कौठा येथे आले होते. परंतु ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम गावात घेतला जाणार नाही, असे म्हणत 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देण्यात आली.

यापूर्वी विकसित भारत संकल्प यात्रा कौठा ग्रामस्थांच्या वतीने थांबविण्यात आली होती. याहीवेळी विविध घोषणा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवले होते. शुक्रवारी शासनाचा ईव्हीएम संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी मंडळ अधिकारी ए. एस. शिंदे, पथकप्रमुख आर. डी. बोचरे, तलाठी शुभांगी जाधव, ग्रामसेवक डी. के. आजादे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते. परंतु ग्रामस्थांनी शासकीय कार्यक्रमाला विरोध दर्शविला. गावात मागच्या बारा दिवसांपासून आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असून मागील महिन्यातच ग्रामस्थांनी गावात 'राजकीय पक्ष आणि निवडणुकीवर बहिष्कार' असे फलक लावले आहे. तसेच निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्या दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news