

Youth murdered with axe over old dispute
नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे आज सकाळी झालेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुऱ्हाडीने वार करून भरदिवसा तरुणाचा निघृण खून झाला आहे. शनिवारी (दि. १) सकाळी नऊच्या सुमारास केशेगाव येथील चावडी चौकात हा प्रकार घडला. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दाराम पंडित दहीटणे (वय ३५) हे सकाळी चावडी चौकातील एका हॉटेलजवळ खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होते. त्याचवेळी निखिल कांबळे हा मोटार सायकलवर तेथे आला. हातात कुऱ्हाड घेऊन तो दहीटणे यांच्या मागे गेला आणि अचानकपणे त्यांच्या मानेवर आणि शरीरावर सपासप वार केले.
सलग सात ते आठ घावांमुळे दहीटणे जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. खून करून निखिल कांबळे हा घटनास्थळावरून मोटारसायकलवरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाणे आणि इटकळ औट पोस्टचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून आरोपी निखिल कांबळे यास ताब्यात घेतले.
खुनाची घटना सीसीटीव्हीत कैद
या घटनेमुळे केशेगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्वी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या खुनाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, दृश्ये अत्यंत भयानक आणि थरारक स्वरूपाची आहेत. पुढील तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत.