उमरगा; पुढारी वृत्तसेवा : कवठा (ता. उमरगा) येथे मराठा समाजाला कुणबी मराठा प्रवर्गातील आरक्षण देण्यासाठीसाठी शनिवारी, (दि २१) ग्रामस्थांच्या वतीने गावबंद आंदोलन करण्यात आले.
कवठा येथे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी १७ सप्टेंबर पासून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कवठा ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान सरकारला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली.
त्यानंतर गावातील विष्णू मंदिरापासून पाटील यांच्या उपोषण स्थळापर्यत आरक्षण रॅली काढण्यात आली. उपोषण स्थळी रॅली पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करण्याची शपथ घेतली. रॅलीत शाळकरी विद्यार्थी, महिला, मुली, तरुण व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. तर विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे राजेंद्र सोनवणे, सतीश पवार, अलका माने, शोभा सोनवणे, मंगल माने, यांनी अभंग गायनातून मराठा आरक्षणाची मागणी केली.