

अणदूर, पुढारी वृत्तसेवा;
ग्रामस्वच्छता अभियानात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या खुदावाडी ग्रामपंचायतीला ग्रासेवकांनी गुरुवारी (दि.२४) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सीलबंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोदावाडी ग्रामपंचायत कार्यालयास खुद्द ग्रामसेवक संजय घोगरे यांनी स्वतः सील ठोकले आहे. सील ठोकण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. या सील ठोकण्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही ग्रामपंचायत प्रसिद्धीस आली आहे.
या ग्रामपंचायत कार्यालयात दगडू गायकवाड पाणी पुरवठा, भास्कर हुलदुरे लिपिक, पांडुरंग व्हलदुरे पिठाची गिरणी चालवणे, राहुल चव्हाण मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षणार्थी हे कर्मचारी कार्यरत असून ते कर्मचारी वेळेवरती ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे व कामे करत नसल्याचे ग्रामसेवक संजय घोगरे यांचे म्हणणे आहे.
मात्र काही का असेना आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभर नाव लौकिक मिळवलेल्या खुदावाडी ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांनी कुलूप लावण्याच्या प्रकारामुळे राज्यभर नामुष्कीची वेळ या ग्रामपंचायतीवर आली आहे.