

धाराशिव : तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या चोरीचा अखेर छडा लागला आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संस्थेच्याच एका शिपायास अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तुळजापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता लोकमंगल मल्टीस्टेट या बँकेतून ३४,६०,८६० रुपये रोख आणि २ किलो ७२२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याबाबत गुन्हेगाराने कोणतेही पुरावे मागे राहणार नाहीत याची काळजी घेतल्याने तपास करण्यात पोलिसांना अडथळे येत होते यातील आरोपी हा शिपाई असला तरी त्याने यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी केली होती. त्याने ही चोरी करताना एकही पुरावा मागे राहणार नाही याची काळजी घेतली होती.
गुन्हा करण्यापूर्वी दोन महिने त्याने स्वतःचा मोबाईलही वापरला नव्हता. बँकेत आलेल्या एका आधार कार्डचा वापर करून त्याने त्या नावानेच नवीन सिम कार्ड घेतले होते. परिणामी या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अडथळे आले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांनी या गुन्ह्याचा तपास कौशल्याने करत नागपूर येथे दडून बसलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संस्थेतील शिपाई दत्ता नागनाथ कांबळे याला नागपूर येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला आणि लपवलेला ११ लाख रुपये रोख व २ किलो १५९ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी ही माहिती दिली यावेळी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून यासाठी त्यांना बक्षीस ही देणार असल्याचे जाहीर केले.