

Rameshwar chincholi Woman Dies in Flood
भूम : भूम तालुक्यात रविवारी (दि.२१) रात्री उशिरा मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली. रामेश्वर व चिंचोली परिसरातील वस्तीवर पावसाचे पाणी धडकले आणि यात झोपेत असलेल्या एका महिलेला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर–भूम रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या देवनाबाई नवनाथ वारे (वय अंदाजे 55) या झोपेत असतानाच अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात सापडल्या. पाण्याचा प्रचंड वेग इतका होता की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तहसीलदार व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे परिसरातील शेती व झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे चिंचोली गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे “कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी व पावसाळ्यात सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात” अशी मागणी केली आहे.