धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सिंदफळ (ता. तुळजापूर) येथे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्यात एकेरी भाषेत वादावादी झाली. ‘तू असशील तुझ्या घरचा पाटील’, चावणार्या लोकांची बाईट घेता काय..?, डॉबरमॅन छू... असे शब्दप्रयोग दोन्ही बाजूंनी झाले. (Ranajagjitsinh Patil On Dheeraj Patil)
आ. पाटील यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या प्रगतीची तसेच झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार दौरा शनिवारी (दि. 5) आयोजिला होता. त्यानुसार सर्व पत्रकार तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आ. पाटील यांच्या समवेत सिंदफळ येथे पोहोचले होते. तिथे या प्रकल्पाची तांत्रिक माहिती देत असतानाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील तिथे काही शेतकरी व समर्थक, कार्यकर्त्यांसह आले. दिगंबर पाटील, अमोल कुतवळ सोबत होते. त्यांनी मंडपात येत राजेंद्र भोसले या शेतकर्यावर जमिनीच्या मावेजाबाबत झालेल्या अन्यायाचा जाब विचारत दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका, असे सुनावले. या प्रकाराने उपस्थित सर्वच गांगरुन केले. (Ranajagjitsinh Patil On Dheeraj Patil)
अॅड. पाटील यांची समजूत काढण्यासाठी काही अधिकारी पुढे आले. त्याचवेळी आ. पाटील यांनीही समोर येत राजकीय नौटंकी करु नका. खाली बसा आपण बोलू, असे सांगत संवाद सुरु केला. त्यावर अॅड. पाटील यांनी नौटंकी कोण करतंय, न केलेल्या कामाचे श्रेय कोण घेतंय, असे उपरोधिक विचारत टीका केली. या प्रकारानंतर उपस्थित अधिकारी, पोलिसांनी अॅड. पाटील यांना तेथून दूर नेले. त्यानंतर काही वेळाने आ. पाटील तेथून निघाले असताना पुन्हा बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंच्या पदाधिकार्यांनी एकेरी शब्द वापरत एकमेकांच्या नेत्यांवर टीका केली.
चावणारे लोक, डॉबरमॅन, तू पाटील तुझ्या घरचा असे वाक्य उच्चारत ही धुमश्चक्री सुरुच होती. या वेळी विनोद गंगणे, संतोष बोबडे, आनंद कंदले, नितीन काळे, नारायण ननवरे, सचिन रोचकरी हे आ. पाटील यांच्यासोबत होते.