शंकर बिराजदार
कर्करोगावर मात करीत हालाखीच्या परिस्थितीतील जाणाऱ्या मित्राला त्याच्या सहकारी वर्गमित्रांनी मैत्रीदिनी मोठी भेट दिली आहे. १९९६-९७ च्या दहावीच्या वर्गातील मित्राला वर्गमित्रांनी रविवारी (दि.४) रिक्षा भेट देऊन जीवनातील खरी मैत्री निभावली आहे.
मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील १९९६-९७ च्या वर्गातील आनंद कोळी आपल्या शिक्षणानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवायचे. कोरोना महामारीनंतर २०२१ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यावरील उपचारासाठी उपजिविकेचे साधन असलेली रिक्षा विकावी लागली होती. त्यानंतर आनंद याने सकारात्मक मानसिकतेमुळे इच्छा शक्तीच्या जोरावर कर्करोगावर मात केली. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न सतत सतावत होता.
आनंदची हि हालाखीची परिस्थिती वर्गमित्रांना समजताच सर्व वर्गमित्रानी एकत्र येऊन रक्कम जमा केली. जमलेल्या रकमेतून आनंद यांना उपजिविकेसाठी एक मालवाहू रिक्षा खरेदी करून भेट दिली. यावेळी मित्रांकडून झालेली मदत पाहुन आनंद भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूं वाहू लागले. उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वर्गमित्रानी आनंद कोळी रिक्षा यांना सुपूर्द केला. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष मनेष माणिकवार, सचिव शिवप्रसाद लड्डा, संतराम मुरजानी, मनिष सोनी, महेश आळंगे, रवी चिंचोळे, विनायक कुलकर्णी, राम बोधे, राजू मेरू, राम पाटील,आनंदचे वर्गमित्र गणेश अंबर, रविंद्र सुतार, कल्लेश्वर पांचाळ, शंकर घोडके, सुधीर टिकांबरे, बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब खंडागळे, दिपक शिंदे, अभिजित चौधरी, धिरेंद्र चौधरी, सतीष बिराजदार, अनिल वाले आदी उपस्थित होते.