उमरगा : शहरात एक अल्पवयीन शालेय मुलगा व्हाईटनर आणि सोल्युशनच्या आहारी गेल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे या नशेच्या विळख्यात अजून किती मुले अडकले आहेत, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. (Whitener Addiction)
उमरगा शहरातील एका गरीब कुटुंबातील एकुलता एक तेरा वर्षीय मुलगा सोल्यूशनची नशेच्या आहारी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नशेच्या आहारी गेलेल्या मुलांसह आई व नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना मुलांच्या नशेची माहिती दिली. पोलिसांनी भावनिक आधार देत मुलांचे तब्बल दोन तास समुपदेशन केले. शेवटी पोलिसांनी मुलाला मानसोपचार तज्ञ व व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी एकुलता एक मुलगा नशेच्या विळख्यातून बाहेर पडावा, म्हणून आई धाय मोकलून रडत पोलिसांच्या पाया पडत होती. (Whitener Addiction)
शालेय मुलांच्या खिशात, स्कूलबॅगमध्ये, व्हाईटनर हमखास आढळून येतो. शाळेत व्हाईटनरची खरीच गरज आहे का ? त्याचा वापर किती होतो, याकडे सहसा कोणताही पालक लक्ष द्यायला तयार नाहीत. मात्र, याच व्हाईटनर व सोल्युशनचा रुमालात ठेवून नशेसाठी वापर केला जात आहे. ज्या घरातील आई आणि वडील हे दोघेही नोकरी, मजुरी, व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात, अशा घरातील अधिक मुले नशेकडे वळल्याचे दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागात शाळकरी मुले, किशोर वयीन मुले आणि काही तरुणांमध्ये सिगारेट, तंबाखु, गुटखा, मावा आणि मद्य या नशेसोबतच व्हाईटनर आणि सोल्युशन यापासून नशा करण्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक वाढले आहेत. काही ठिकाणी तर ही नशा म्हणजे किशोरवयीन मुलांची फॅशन बनत चालली आहे.
खेळण्या बागडण्याच्या वयातील अल्पवयीन मुलांमध्ये रुजणारी ही नशेची फॅशन सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. या कोवळ्या वयात व्यसनांचा वाढता विळखा तोडणे पालकांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा उद्याची भावी पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन आपले भवितव्य अंधकारमय करण्याच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.
पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी व इतर विशेष मोहिमा राबविण्यात येतात. या समस्येवर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून यावर विचार करणे गरजेचे आहे. पालक, शिक्षक, तज्ञ, पोलीस तसेच समाजाने याबाबत गांभिर्याने विचार करुन मुलांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.
– डी. बी. पारेकर, पोलीस निरीक्षक
पालकांनी मुलांच्या शाळा, महविद्यालय व क्लासेसच्या शिक्षकांसोबत कायम संपर्कात राहणे गरजेचे आहे. अभ्यासासोबत वर्तणुकीची चौकशी करावी. मुलांना आवडीच्या छोट्याछोट्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. सततचा अभ्यास, क्लासेसचा शैक्षणिक तणाव आणि पालकांचा त्यांच्याशी योग्य सुसंवाद नसल्याने ते व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका अधिक असतो.
– डॉ. प्रशांत मोरे, उमरगा
हेही वाचा